मुंबै, दिनांक :- पा/ऊ/स.

चायनीज छत्र्या विकनारांचे जत्थे नी त्यांच्या आरोळ्या, गर्दी सगळ्यांची एकदम झालेली, कसले कसले वास,ओलांडून  जरा बाजूला आलो तर, `लवकर येणारे, आपल्याला आज भिजायचंय विसरलास का? '
एका छत्रीतून येणारा आवाज कानावर पडला. आम्ही थांबलो.
`जमतंय का आज ? कि मी जाऊ एकटी भिजायला?' - ती छत्री. 
मी प्रव्याला म्हणालो, हि अजून किती भिजणारे? आधीच बघ केवढी भिजलीये.
`नाही नाही, हो  होरे कोरडीच आहे, खरंच नाही भिजले रे.'
आम्ही बुंग.
`अं, काय? तुला सोडून कशी भिजेन?' - ती स्वस्थ. आणी तिच्यापेक्षा `त्याची' काळजी आम्हांलाच वाटायला लागली.
`तो' येईपर्यंत हि कोरडी कशी काय होईल? हे पिल्लू डोक्यात घेऊन आम्हि त्या छत्रीला सोडून सटकलो.
दोन बार बघून झाले.जाम गर्दी. तिसऱ्यात जागा मिळाली.
`प्रव्या सालं, इथे बार मध्येपण टेबल शेअर करायला लागतं.' मी वैतागून.
`आहे हे असं आहे. जागा कमी. बाकी सगळं जास्त. नि मघाशी ती छत्री बघितलीस ना?' प्रव्याने ग्लास रिकामे करायला सुरवात केलेली.
मग गप्पा. त्यात ए.बी. आले कुठून तरी. मग मी त्यांना फोन लावला. नाही लागला.
`ए.बी. मुंबईला यायचं टाळतात.' मी.
`का?' प्रव्या डोळे ग्लासात बुडवून.
ते मागे मला म्हणाले ``हल्ली मुंबई लग्न झालेल्या प्रेयसीसारखी भेटते''.  मी म्हणालो तसं त्याला काहीतरी झालं.
`चांगलं आहे कि मग'. तो सुटला.
`दुसऱ्याच्या अंथरुणाच्या घड्या घालणारी बायको बघत तिच्याशी संसार करत बसण्यापेक्षा, लग्न झालेली प्रेयसी परवडली.'  तो अजून काही बोलणार मी थांबवला.
`प्रव्या आपण मुंबई विषयी बोलत होतो नाही का?'
`माहित नाही का पण ती छत्री भिरभिरली डोक्यात ,चल जाऊयात '. तो.
बाहेर पडलों. पाऊस सुरूच.
माझी नजर उगाचच `ती छत्री' उभी होती त्या  जागेवर गेली.
तिथे आता पाण्याने एक डबकं केलं होतं, दोन-तीन बेडकांना घेऊन.

मुंबै, दिनांक :- पा/ऊ/स.

सचिन ठाकूर.

मुंबै, दिनांक -: पा / ऊ / स.

पायात पैंजण नाहीत,
गळा मोकळा,
नाकात काही घालण्याचा प्रश्नच नाही,
कानातल्यांची तर मी दंतकथाच करून टाकलेली 
म्हणजे इकडे तिकडे दुसरीकडे कुठे 
जीव अडकण्याचा संबंधच नाही.
फक्त तू .
.
.
.
.
.
.
फक्त तू  पाऊस नसून मुलगी असतास तर ..
तरुण वयात आलेली धुवांधार बरसणारी ..
.
.
.
सकाळी ह्या खिडकीच काहीतरी करायला हवं.
कसले कसले विचार येतात तिच्यातून.
काल प्रव्याला सांगितलं पाऊस हसल्यासारखा वाटला मला.
त्याने डिस्प्रीन दिली मला.
आज सांगितलं तर ...

मुंबै, दिनांक -: पा / ऊ / स.
सचिन ठाकूर.

मुंबै, दिनांक -: पा / ऊ / स

तू 
टीमटीमणारे दिवे तुझे 
२४ तास १२ महिने .
तू 
सबंध आयुष्यावर पसरलेला 
एक न संपणारा आळस.
सकाळ तुपार न रात्र ......
तुझ्यावर थापलेली पावडर 
दिवसातून चारदा पोतेरं फिरवून 
सजतेस तू  पुन्हा नव्या गिर्हाईकासाठी 
तुझे नखरे तुझे रुसवे फुगवे सगळे लाड तुझे 
पुरवावेच  लागतात,
वा पुरवून घेतेस तू  नी मी पुरवतो ते सगळं
मला कबूल असल्यासारखं.
माझ्यासाठी तुझ्याकडे काहीच नाही वेगळं.
सर्वाना सारखीच भेटतेस तू  नी भेटत राहशील 
न थकता.
हे तुझ्या अंगाखांद्यांवर पसरलेले रूळ नी रस्ते 
तुझ्या धमण्यासारखे जे आहेत,
किंवा गटारं रक्तवाहिन्यासारख्या 
जाळे पसरून
किंवा बरंच काही,
लेम्प पोस्ट, सिग्नल, विजेच्या तारा,
किंवा
समुद्र (तू केलेली एक मोठी ओकारी सारखा जो वाटतो मला कधी कधी ),
किंवा
बिल्डिंगा आकाशाच्या पप्पी घेणाऱ्या,झोपड्या,रेस्तरो नी बार,
बॉलीवूड नी फिलीवूड, 
हौसेनं उभ्या हौसिंग सोसायट्या,
लिपस्टिक लावून सजलेल्या गल्या
त्यातल्या त्यात 
बीचेस,वाळू,गार्डन,फुलं-बिलं
माणूस-बिणूस....,,
मुंबै, 
तुझा नेमका पत्ता आहे का ?
काये तो ?
कुणाकडे ?


मुंबै, दिनांक -:  पा / ऊ / स 
सचिन ठाकूर.

मुंबै दिनांक :- पा/ऊ/स.

खिडक्या- दारं बंद करून घराच्या पोटात आत शिरून एक बंदिस्त सुरक्षित आवरण स्वतः भोवती निर्माण केल्याचा भास निर्माण करून आत धुसमुसणाऱ्या वा धुमसणाऱ्या कुठल्याही भावनेचा छळ किंवा कानउघडणी करता येणे म्हणजे स्वतः चे हजार तुकडे करून परत त्यांची पुनर्बांधणी करता येण्यासारखीच आहे. त्यातही पुन्हा एकाही टाक्याची चाल बटबटीत वाटता कामा नये. आणि अशा वेळी बाहेर पाऊस कोसळत असला तर..?
... अशा वेळी देहानेच सहयोग देण्याचं नाकारलं तर ...
... अशा वेळी मलाच पाऊस व्हावंसं वाटू  लागलं तर ...?


मुंबै दिनांक :- पा/ऊ/स.
सचिन ठाकूर.
प्रिया ने कमेंट केलीये, `` पुढची पी.एल. ची कविता वाचायला आवडेल'' अशी. sorry प्रिया खूप उशिराने उत्तर लिहितोय. कायेना, पावसात अडकलोय. खरं तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाऊस आला. तिसऱ्या, चौथ्या दिवशीही. इथे रोजच पाउस. पण माझा धीरच झाला नाही, तिकडे जाण्याचा. विशेष म्हणजे तीन - चार दिवसांनीच १२ जून , पी.एल.चा स्मृतिदिन. तो कसा विसरेन मी? त्या दिवशी मी काय केलं? असा प्रश्न पडला तरी विचारू नकोस. पावसाळा संपायला अजून अवकाश आहे, कदाचित तुझी इच्छा पूर्ण हि होईल.......

मुंबै दिनांक - पा . ऊ . स .

झोपेच्या चाळणीतून सांडलेल्या स्वप्नांना 
सावरण्यासाठी परत चाळणीच्याच अंगणाची झोप मिळावी 
हा लाक्षणिक योगायोग दिवस अन रात्रींच्या न संपणार्या
छिद्रातून अनाहूतपणे 
झरत असतो आणी झुरतही असतो ..
आणी पुन्हा ती झोप पावसाळ्याच्या 
रात्रींची असेल तर ....
     सखीच्या स्तनात 
     पावसाळी ओल
     पेटल्या देहात 
     विजेचा कल्लोळ ....


मुंबै दिनांक - पा . ऊ . स .

सचिन ठाकूर 



मुंबै दिनांक - पा . ऊ . स .

वो शाम बारीश कि 
.
.
.
.
.
.
तुम्हारे जीस्मपर गिरकर मेरे 
होठो पर जो संभ्ली थी
.
.
.
आज कागजपर उतरतेही पता नही क्यू ...
नंगीसी लगने लगी है
वो शाम ..
वो बारीश कि शाम.....


मुंबै,दिनांक - पा -ऊ - स .
सचिन ठाकूर

मुंबै दिनांक - ``पा / ऊ / स''.

 त्याचं आपलं खाली मान घालून खिळा किती खोलवर घुसलाय हे बघण चालू होतं. तशी खिळ्याने केलेल्या डेमेजची त्याला जाणीव होती.तरी डोळे फाडून फाडून तो बघत होता नी अंगावरून पाणी निथळत होतं. तेवढ्यात ती आली. अनपेक्षित. त्याचं लक्ष खिळ्याकडे.
 तीही भिजली होती. तिने त्याला बघितलं.इच्छा नव्हती पण जागा कमी. त्यामुळे त्याच्या शेजारी उभं रहाणं भाग नि बोलणही.
`अरे हाय, किती दिवसांनी! कसा आहेस?' उसण हसू  आणून तिने चेहरा ताणला.
त्याने क्षण भर डोळे वर करून बघितलं.
'बराय. तू?'
'मस्त.' ती तशीच.
मग जरा वेळ शांतता.
`पाउस थांबला नाही का अजून?' - तो आता तिच्या डोळ्यात डोळे घालून. बहुदा घुसलेला खिळा विसरून.
 `नाही ना. केवढे भिजले मी. तुला काय झालं?'
`काही नाही. हवा भरायला आलो. आणी तू?'  त्याने खिळ्याचा विषय टाळला.
`repaint   करायचं.' ती बोलून गेली. पण तिला कशाला  खरं सांगितलं असं झालं.
हजारदा केलं तरी लपणारे का? तो बोलणार होता, पण नाही बोलला. डोळ्यात जाणवत होतं. स्पष्ट.
`का? काय झालं?' - ती.
`कुठे काय? चांगला आहे कि हा पण'. - तो.
`हं, केला तेव्हा ठीक वाटला मला पण, चेंज हवाय आता. बघूया दुसरा चांगला मिळतोय का, नाहीतर ठेवेन अजून काही दिवस.'
हिला आपला रंग ओळखता येवू नये ह्याची त्याला दया आली. खिळ्याच काम झालं होतं. 
`चल मी निघतो'. - तो.
`अरे, पाउस थांबला नाहीये अजून'. - ती.
`हं, पण जावं लागेल. लोडेड आहे ऑन ड्युटी. वेळेत जायचं. आणी मला माझ्या रंगाची काळजी कधी होती? बाय.'
तो रस्त्यावर आला. गारांसारखे टपोरे थेंब त्याच्या बोनेटवर वेगाने आपटू लागले.
तसा ताड ताड आवाज तिचे कान फोडू लागला.
समोरच्या वळणावरचे पाणी उडवत तो पावसाच्या सरींच्या दाट पडद्याआड दिसेनासा झाला.


मुंबै दिनांक - ``पा/ऊ/स''
सचिन ठाकूर.

मुंबै दिनांक : पा - ऊ - स .........

पहाटेचे २:२६. नि बाहेर जोरदार पावसाची सर.
तंगड्या पसरून ज रा शी  डुलकी घेणाऱ्या मुंबैवर ....
बाकी मुंबैत रात्री रौनक. 
सगळीकडे अंधार काळा तो बघू देत नाही , नी चमचमणारे दिवे फक्त. 
३५ मिनिटे पाऊस कोसळला बहुतेक. 
नी तेवढ्यातल्या तेवढ्यात ५/६ वर्षांचे सारे पावसाळे ग्यालरीत एकट्या उभ्या मला दाटीवाटीने बिलगून उभे राहिले.
बाहेरचा पाऊस बघत.
चांगलं चाललं काही वेळ.
नंतर 
वजाबाकी, जमाखर्च,हिशोब वगैरे करू म्हणाले.
तसा मी कानात हेडफोन कोंबला.
आपलं गणीत कच्चं. 
नेमकं काय मोजायचं आणी काय वगळायच? 
कुणाला मोजायचं नी काय टाळायच ?
हे ठरवता येत नाही आपल्याला.
बाकी ...........
रात्रीचा पाऊस म्हणजे .....
.
.
.
.   
मुंबै दिनांक : पा - ऊ - स .........

सचिन ठाकूर .

मुंबै, दिनांक - पा / ऊ / स .

``अजिबात रडायचं नाही, तुला माहितीये ना मला आवडत नाही रडलेलं.'' - तो.
तिची मान तिने इकडची तिकडे केली.
``सारखं आपलं  रडरडीला आतुर, कशाला ना?'' - तो.
ती गप्प.
``डोळे मिट, हं आता उलटे अंक मोज, जाईल हळूच.'' - तो.
ती गप्प.
``आणि एकाच वेळी दोघांनी नको असं वागायला. तो अजून चार महिने ऐकणार नाही.निदान तू तरी.. .'' - तो.
ती गप्प.
`` तुला कंटाला आला का? सारखं बालगंधर्वांच्या पोस्टरकडे बघून बघून?'' - तो.
ती गप्प.
`` तुला सुबोध आवडायला लागलाय का? दाखवला असता तुला सिनेमा पण ते घेणार नाहीत ना आपल्याला आत ''
ती गप्प.
``चल दुसरीकडे जाऊ. मी तुला पावसाचं गाणं शिकवतो. इथे ट्राफिकचा आवाज आहे  .'' - तो.
 '' नको मला कामं आहेत, मी जाते.'' - ती.
तिने प्लाझाच्या कठड्यावरून कबुतर खाण्याच्या दिशेने उडी मारली एकदम.
तो तिच्या पंखांच्या ठीपक्यांकडे पाहत राहिला.
आणी.....
.
.
.
.    
.
.
.....पाऊस मोठा झाला.........

मुंबै दिनांक ... ... ... पाउस ....

सचिन ठाकूर

मुंबै, दिनांक - पा / ऊ / स .

काल राविन्द्रला पोहचता पोहचता पाऊस सुरु झाला.
आयला कुठही असलो तरी हे पावसाच खूळ काही जात नाही.
संध्याकाळ झालीच होती.
पावसाने अंधार केला.
मी उतरलो पावसात. एकटा.
पद्या, भिकारचोट काचेच्या दारामागून बघत राहिला.
खूप शिव्या घातल्या. म्हणाला कालच भिजलो होतो रे आज नको.
मला वाटलं साला पाऊस म्हणजे काय ... चा वडापाव आहे? कालच खाल्ला आज नको म्हणायला. नंतर आजूबाजूला बघितलं तर पद्य सारखे बरेचजन पाउस बघत होते.
हे हे पाऊस पाउस म्हणत .
मला हसायला झाल खूप.
तर आवाज आला, ''ए मुला इकडे ये''.
काय कळलच नाही.
इकडे रे इकडे , ''मी दिसत नाहीये का तुला''?
बघितलं तर पी. एल. हसत होते.
मी म्हणालो ,पी.एल. अहो पुतळ्यातून काय हसताय? शोभतं का हे असं पुतळ्याने हसलेलं? लोक काय म्हणतील?
'ते मरू दे रे, बरं झालं तू आलास.''
आई घातली! मेलो बिलो कि काय? गर्रकन सगळं तपासून बघितलं. सगळं जागच्या जागी होतं.
मी आलो ते बर झालं म्हणजे, कधी पासून वाट बघताय माझी?
अरे बावळट, मी एकटाच भिजत होतो, तू आलास भिजायला ते बरं झालं. तू इथला नाहीस ना?
हो. पण कशावरून?
अरे इथली मानसं पावसात भिजत नाहीत त्याना भिजावं लागतं. आणि हसायला लागले.
पी.एल. हा विनोद होता का?
नाही हि वस्तुस्थिती आहे.
अहो ऑफिस एकीकडे घर दुसरीकडे मध्ये हा पाऊस काय करणार बिचारे?
हं जमेल तसा एन्जोय करतात. ग्रेटच आहेत.
आपल्याला तसं जमवता वगैरे येत नाही पी.एल.
ते तुला बघितलं तेव्हाच कळलं. म्हणून मघाशी हसत होतो.
असल्या भिकारचोट तडजोडी एन्जॉय करत जगण्यात, गंमत नाही गांडूपना वाटतो मला.
'' या शहराला आहेत हजार दारं
आणि लाखो खिडक्या
जी चघळत बसतात दिवसंरात्र
माणूस नावाचं चिंगम ......''
मी त्यांना मध्येच थांबवलं. पी.एल. अहो, माजीच कविता मलाच काय ऐकवताय?
पुढच्यावेळी माजी ऐकवीन प्रॉमिस. येशील ना? पुढच्या पावसात?
आणि ते परत हसायला लागले.
मी- येईन. प्रॉमिस. आता का हसताय पण ?
पी.एल.- शहाणा हो. असं पुतळ्याशी भर पावसात कुणी गप्पा करत बसतं का?
लोक काय म्हणतील.
या वेळी मात्र अजिबात हसले नाहीत. जरासुद्धा नाही.
नंतर ते खूप बोलत राहिले. मला काहीच ऐकायला नाही आलं.
पाऊस ओसरला होता. पद्या आला.
काय रे काय झालं?
झक मारली आणि पावसात आलो.
का?
उद्या संध्याकाळी पाऊस पडला पाहिजे.
का?
काही नाही रे कविता ऐकायचीये मला. तू चल.


मुंबै, दिनांक -  पा / ऊ / स .

सचिन ठाकूर ...