मुंबै, दिनांक :- पा/ऊ/स.

चायनीज छत्र्या विकनारांचे जत्थे नी त्यांच्या आरोळ्या, गर्दी सगळ्यांची एकदम झालेली, कसले कसले वास,ओलांडून  जरा बाजूला आलो तर, `लवकर येणारे, आपल्याला आज भिजायचंय विसरलास का? '
एका छत्रीतून येणारा आवाज कानावर पडला. आम्ही थांबलो.
`जमतंय का आज ? कि मी जाऊ एकटी भिजायला?' - ती छत्री. 
मी प्रव्याला म्हणालो, हि अजून किती भिजणारे? आधीच बघ केवढी भिजलीये.
`नाही नाही, हो  होरे कोरडीच आहे, खरंच नाही भिजले रे.'
आम्ही बुंग.
`अं, काय? तुला सोडून कशी भिजेन?' - ती स्वस्थ. आणी तिच्यापेक्षा `त्याची' काळजी आम्हांलाच वाटायला लागली.
`तो' येईपर्यंत हि कोरडी कशी काय होईल? हे पिल्लू डोक्यात घेऊन आम्हि त्या छत्रीला सोडून सटकलो.
दोन बार बघून झाले.जाम गर्दी. तिसऱ्यात जागा मिळाली.
`प्रव्या सालं, इथे बार मध्येपण टेबल शेअर करायला लागतं.' मी वैतागून.
`आहे हे असं आहे. जागा कमी. बाकी सगळं जास्त. नि मघाशी ती छत्री बघितलीस ना?' प्रव्याने ग्लास रिकामे करायला सुरवात केलेली.
मग गप्पा. त्यात ए.बी. आले कुठून तरी. मग मी त्यांना फोन लावला. नाही लागला.
`ए.बी. मुंबईला यायचं टाळतात.' मी.
`का?' प्रव्या डोळे ग्लासात बुडवून.
ते मागे मला म्हणाले ``हल्ली मुंबई लग्न झालेल्या प्रेयसीसारखी भेटते''.  मी म्हणालो तसं त्याला काहीतरी झालं.
`चांगलं आहे कि मग'. तो सुटला.
`दुसऱ्याच्या अंथरुणाच्या घड्या घालणारी बायको बघत तिच्याशी संसार करत बसण्यापेक्षा, लग्न झालेली प्रेयसी परवडली.'  तो अजून काही बोलणार मी थांबवला.
`प्रव्या आपण मुंबई विषयी बोलत होतो नाही का?'
`माहित नाही का पण ती छत्री भिरभिरली डोक्यात ,चल जाऊयात '. तो.
बाहेर पडलों. पाऊस सुरूच.
माझी नजर उगाचच `ती छत्री' उभी होती त्या  जागेवर गेली.
तिथे आता पाण्याने एक डबकं केलं होतं, दोन-तीन बेडकांना घेऊन.

मुंबै, दिनांक :- पा/ऊ/स.

सचिन ठाकूर.

No comments:

Post a Comment