मुंबै:- दिनांक ?/?/?

मुंबई काहीही झालं तरी
दुसऱ्या क्षणाला चालायला लागते.
थांबत नाही.
पर्याय काये तिच्यापुढे दुसरा......?


मुंबै:- दिनांक ?/?/?

सचिन ठाकूर.

मुंबै:- दिनांक-----

बातम्यावाल्या पोरापोरींचे सुपर फास्ट गुऱ्हाळ, केमेऱ्यांची-बघ्यांची गर्दी, आता पोलिसांच्या गाड्याच गाड्या. काल कुठे होते सगळे?
मेलेल्यांना अमुक अमुक - जखमींना अमुक अमुक , तपास अमुक तमुक सुरु आहे.
ह्या पलीकडे काही होणार नाही.
आपण बसू परत पांढर्यावर काळ करत.
``किती दिवस झाले, चांगला सिनेमा बघून. हल्ली बनवतच नाहीयेत चांगलं काही.''
``रोज काय नवीन बनवू जेवायला? गिळा.''
``सुट्टी मिळत नाहीये''
``सगळ्यांचे भाव वाढलेत''
``जीन्स नको पंजाबी घाल''
``काय हि गर्दी? सगळे इथेच घुसले वाटतं''
``पावसामुळे बाहेर सुद्धा पडता येत नाहीये, तू पुढे हो आलोच''
``बोक्या, कुठेयेस? पोहचलास का? कुठे ? नको. ब्लास्ट झालाय. स्टे फ्री आणेन मी''
``साला , मी पण एक घोटाळा करू म्हणतो, इतके करतात ''
``हृतिक काय दिसलाय पण नाही ''
``निषेध निषेध निषेध ''
``चार टक्के अजून असते, तर चार पैसे कमी लागले असते''
``अजून भारीये बे, काय दिसते एकदम ...''
``कानडा राजा पंढरीचा''
``चलता है क्या? दो दीनसे धंदा खराब साला ''
``गोळ्या घातल्या पाहिजेत सगळ्यांना''
``घंटा..''
``पप्पी दे ना''
``बाबांशी कधी बोलायचं?''
``भाग भाग डी के बोस ''
``सगळे खातात रे ''
``स्कोर काय झाला?''
``अप- डाऊन''
``मागे-पुढे''
``वात. हो नक्की, शुगर पण ''
``मेडिसिन पण महाग, गरिबांनी काय मरायचं?''
``शीला लावा जरा''
``थांब ना, साडेबाराच तर वाजलेत''
........
........
``उद्याच उद्या .......''
.
.
.
मुंबै:- दिनांक-----
सचिन ठाकूर.

मुंबै:- दिनांक------

ब्लास्ट झालेल्या जागेवर जाऊ म्हणालो तर, पद्याने taxi  पकडून घरी जाण्याची घाई केली. 
मुंबईतल्या आपल्यांना, मित्र मैत्रीणीना आठवून आठवून फोन केले. `त्यात' आपलं किंवा ओळखीचं कुणी नव्हतं. 
हे सुखद. आणि जे तिथे होते त्यांच्यासाठी कोरडी हळहळ. शी.......



मुंबै:- दिनांक------

सचिन ठाकूर.

मुंबै, दिनांक :- पा / ऊ / स .

१० मिनिटांपूर्वी
कबुतरखाण्याच्या bus stop वर मी उभा.
मी इथे रेंगाळतो. का माहित नाही.
बाजूचा चप्पल वाला मला नेहमी ओळखीचा वाटतो.
रोजचंच सगळं. तीच गर्दी, तसाच ट्राफिक, आवाज, गोंधळ, गडबड सगळंच
पण सुरळीत.

१० मिनिटानंतर,
मी पुढे आलो. लाजरीचा फुटपाथ ओलांडला असेल नसेल ,
एकच मोठा आवाज. आकाशात पक्षांचा सैर भैर गोंगाट.
काय झालं हे कळलंच नाही. मी निवांत. नंतर फाटलीच.
पार हादरून.

ब्लास्ट.


रात्र भर पडणाऱ्या पावसाने तिथले सारे वातावरण  आता धुवून टाकले असेल.
१० मी. मी तिथेच अजून रेंगाळलो असतो तर......



मुंबै, दिनांक :- पा / ऊ / स .
सचिन ठाकूर. 

मुबै दिनांक पा / ऊ / स.

आंधळा विश्वास ठेवून जगण्यावर, आपण कदाचित जगत असतो.
आपल्याला सोडून कधी कुणी जाणार नाही- असा आंधळा विश्वास ठेवून, तो घेवून आपण आपल्याच लोकांवर रागावतो,
चिडतो, भांडतो, आपले लाड पुरवून घेतो नी त्या गडबडीत आपल्याच लोकांसाठी करायच्या गोष्टी राहून जातात.
साध्या- छोट्याच असतात पण खूप गरजेच्या.
आणी त्यांचं नसणं स्वीकारतांना त्याच छोट्या गोष्टी मेंदू कुरतडत बसतात.
आज दुसरा दिवस, पाऊस सारखा बरसतोय.
बाहेर पाऊस,
खिडकीत तू गेल्याची बातमी,
आत मी.
माझ्या आत सोडून गेलेल्या साऱ्यांचा मेळा.
रसिका  माहित नाही का पण तुला
thanks आणी  sorry
म्हणायचं राहून गेलं.




मुबै दिनांक  पा/ ऊ / स.
सचिन ठाकूर.

मुंबै, दिनांक :- पा/ ऊ/ स.

वह्या,पुस्तकं,अर्धवट लिहिलेल्या- कागदावर आळसावणार्या कथा कविता नाटकांचे प्लोट्स, एश ट्रे कॉफीचा मग
अंथरूण मायकलच डेंजरस नि यान्नीच रेन मेकर...; आवरता सावरता येईल अशी प्रत्येक गोष्ट नीट जगाच्या जागी 
लावून ठेवली.
.
.
.
.
.
.
ढग तर भरून आलेत बाहेर !!!

मुंबै, दिनांक :- पा/ ऊ/ स.
सचिन ठाकूर.