मुंबै दिनांक - ``पा / ऊ / स''.

 त्याचं आपलं खाली मान घालून खिळा किती खोलवर घुसलाय हे बघण चालू होतं. तशी खिळ्याने केलेल्या डेमेजची त्याला जाणीव होती.तरी डोळे फाडून फाडून तो बघत होता नी अंगावरून पाणी निथळत होतं. तेवढ्यात ती आली. अनपेक्षित. त्याचं लक्ष खिळ्याकडे.
 तीही भिजली होती. तिने त्याला बघितलं.इच्छा नव्हती पण जागा कमी. त्यामुळे त्याच्या शेजारी उभं रहाणं भाग नि बोलणही.
`अरे हाय, किती दिवसांनी! कसा आहेस?' उसण हसू  आणून तिने चेहरा ताणला.
त्याने क्षण भर डोळे वर करून बघितलं.
'बराय. तू?'
'मस्त.' ती तशीच.
मग जरा वेळ शांतता.
`पाउस थांबला नाही का अजून?' - तो आता तिच्या डोळ्यात डोळे घालून. बहुदा घुसलेला खिळा विसरून.
 `नाही ना. केवढे भिजले मी. तुला काय झालं?'
`काही नाही. हवा भरायला आलो. आणी तू?'  त्याने खिळ्याचा विषय टाळला.
`repaint   करायचं.' ती बोलून गेली. पण तिला कशाला  खरं सांगितलं असं झालं.
हजारदा केलं तरी लपणारे का? तो बोलणार होता, पण नाही बोलला. डोळ्यात जाणवत होतं. स्पष्ट.
`का? काय झालं?' - ती.
`कुठे काय? चांगला आहे कि हा पण'. - तो.
`हं, केला तेव्हा ठीक वाटला मला पण, चेंज हवाय आता. बघूया दुसरा चांगला मिळतोय का, नाहीतर ठेवेन अजून काही दिवस.'
हिला आपला रंग ओळखता येवू नये ह्याची त्याला दया आली. खिळ्याच काम झालं होतं. 
`चल मी निघतो'. - तो.
`अरे, पाउस थांबला नाहीये अजून'. - ती.
`हं, पण जावं लागेल. लोडेड आहे ऑन ड्युटी. वेळेत जायचं. आणी मला माझ्या रंगाची काळजी कधी होती? बाय.'
तो रस्त्यावर आला. गारांसारखे टपोरे थेंब त्याच्या बोनेटवर वेगाने आपटू लागले.
तसा ताड ताड आवाज तिचे कान फोडू लागला.
समोरच्या वळणावरचे पाणी उडवत तो पावसाच्या सरींच्या दाट पडद्याआड दिसेनासा झाला.


मुंबै दिनांक - ``पा/ऊ/स''
सचिन ठाकूर.

No comments:

Post a Comment