मुंबै, दिनांक : पा/ ऊ/ स .

- आणि मग तू  एकदा अचानक हातात `चिरीमिरी' ठेवलस.
पाऊस आला.... मोठा ...
च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ ...
मग तू ओठही दिलेस. 
आणि आपण पाऊस वाटून घेतला.
थेंब न थेंब...
माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही.
मग मीच सांडलो. 
कणाकणांनी तुझ्या ओंजळीत.
-तर म्हणे ते.....
तुझ्या शरीराचा किनारा करत माझं गलबत बुडू दिलं त्यात.


तर पुन्हा तू पुखराज घेवून आडवी झालीस .
`` कहां छुपा दि हैं रात तुने 
कहां छुपाये हैं तुने अपने गुलाबी हाथोके थंडे फाये 
कहां हैं तेरे लबो के चेहरे 
कहां हैं तू आज- तू कहां हैं ?
ये मेरे बिस्तर पे कैसा सन्नाटा सो रहा हैं ?''

ए,तुझ्या गल्लीत पाऊस कोसळतोय का? आत्ता?
कि पारवे एकमेकांच्या पंखात चोची खुपसून 
उसवतायेत एकमेकांना ..?
नी तुला ते बघवत नाहीये...
कि उगाचच श्वासांच्या गरम
प्रदक्षिणा सुरु झाल्यात..? आज आणि काल अशी दोन टोकं धरून..?

माझ्या खिडकीच्या बाहेर पाऊस कोसळतोय पण
मला त्याचं दुसरं टोकच सापडतं नाहीये.
नी खिडकीतल्या खिडकीत गलबत नुसतंच डूचमळतय.

एकदम कुठुनतरी दिव्याचा प्रकाश पडला आणि 
माझा पाऊस नागडा दिसायला लागला ...
.


.
.
मुंबै, दिनांक : पा/ ऊ/ स .

- सचिन ठाकूर.

मुंबै, दिनांक : पाऊस

पाउस सकाळीच घेवून आला आठवणींचा ढोल ताशा..
आणि तडतडला, तडफडला. हि वेळ कुठल्याच भावनेच्या चिमटीत पकडून ठेवता आलीच नाही मला कधी.
सगळीकडे लगबग बाप्पाच्या आगमनाची. मला एकदम पुणं आठवलं. 


मुंबै, दिनांक : पाऊस

मुंबै चा प्रसाद

१२ दिवसांचा मलेरिया,
२:३० तास बेशुद्धीचे,
२ दिवस नर्स वेडी,
३ दिवस डॉक्टर ट्राफिकमध्ये,
सगळ्या मित्रांचा छळ,
हा मुंबईचा पहिला प्रसाद.
४ दिवसांची राखी (ह्या वेळी बहिणींसाठी काय घ्यायचं कळलंच नाही.)
१( तासाचा) स्वातंत्र्य दिन,
 आलो तर अण्णांचा उपोषणाचा १० वा दिवस झाला  तरी वेळ  मिळाला नाही.
आता काढूयात वेळ......

मुंबै चा प्रसाद

मुंबै:- दिनांक ?/?/?

मुंबई काहीही झालं तरी
दुसऱ्या क्षणाला चालायला लागते.
थांबत नाही.
पर्याय काये तिच्यापुढे दुसरा......?


मुंबै:- दिनांक ?/?/?

सचिन ठाकूर.

मुंबै:- दिनांक-----

बातम्यावाल्या पोरापोरींचे सुपर फास्ट गुऱ्हाळ, केमेऱ्यांची-बघ्यांची गर्दी, आता पोलिसांच्या गाड्याच गाड्या. काल कुठे होते सगळे?
मेलेल्यांना अमुक अमुक - जखमींना अमुक अमुक , तपास अमुक तमुक सुरु आहे.
ह्या पलीकडे काही होणार नाही.
आपण बसू परत पांढर्यावर काळ करत.
``किती दिवस झाले, चांगला सिनेमा बघून. हल्ली बनवतच नाहीयेत चांगलं काही.''
``रोज काय नवीन बनवू जेवायला? गिळा.''
``सुट्टी मिळत नाहीये''
``सगळ्यांचे भाव वाढलेत''
``जीन्स नको पंजाबी घाल''
``काय हि गर्दी? सगळे इथेच घुसले वाटतं''
``पावसामुळे बाहेर सुद्धा पडता येत नाहीये, तू पुढे हो आलोच''
``बोक्या, कुठेयेस? पोहचलास का? कुठे ? नको. ब्लास्ट झालाय. स्टे फ्री आणेन मी''
``साला , मी पण एक घोटाळा करू म्हणतो, इतके करतात ''
``हृतिक काय दिसलाय पण नाही ''
``निषेध निषेध निषेध ''
``चार टक्के अजून असते, तर चार पैसे कमी लागले असते''
``अजून भारीये बे, काय दिसते एकदम ...''
``कानडा राजा पंढरीचा''
``चलता है क्या? दो दीनसे धंदा खराब साला ''
``गोळ्या घातल्या पाहिजेत सगळ्यांना''
``घंटा..''
``पप्पी दे ना''
``बाबांशी कधी बोलायचं?''
``भाग भाग डी के बोस ''
``सगळे खातात रे ''
``स्कोर काय झाला?''
``अप- डाऊन''
``मागे-पुढे''
``वात. हो नक्की, शुगर पण ''
``मेडिसिन पण महाग, गरिबांनी काय मरायचं?''
``शीला लावा जरा''
``थांब ना, साडेबाराच तर वाजलेत''
........
........
``उद्याच उद्या .......''
.
.
.
मुंबै:- दिनांक-----
सचिन ठाकूर.

मुंबै:- दिनांक------

ब्लास्ट झालेल्या जागेवर जाऊ म्हणालो तर, पद्याने taxi  पकडून घरी जाण्याची घाई केली. 
मुंबईतल्या आपल्यांना, मित्र मैत्रीणीना आठवून आठवून फोन केले. `त्यात' आपलं किंवा ओळखीचं कुणी नव्हतं. 
हे सुखद. आणि जे तिथे होते त्यांच्यासाठी कोरडी हळहळ. शी.......



मुंबै:- दिनांक------

सचिन ठाकूर.

मुंबै, दिनांक :- पा / ऊ / स .

१० मिनिटांपूर्वी
कबुतरखाण्याच्या bus stop वर मी उभा.
मी इथे रेंगाळतो. का माहित नाही.
बाजूचा चप्पल वाला मला नेहमी ओळखीचा वाटतो.
रोजचंच सगळं. तीच गर्दी, तसाच ट्राफिक, आवाज, गोंधळ, गडबड सगळंच
पण सुरळीत.

१० मिनिटानंतर,
मी पुढे आलो. लाजरीचा फुटपाथ ओलांडला असेल नसेल ,
एकच मोठा आवाज. आकाशात पक्षांचा सैर भैर गोंगाट.
काय झालं हे कळलंच नाही. मी निवांत. नंतर फाटलीच.
पार हादरून.

ब्लास्ट.


रात्र भर पडणाऱ्या पावसाने तिथले सारे वातावरण  आता धुवून टाकले असेल.
१० मी. मी तिथेच अजून रेंगाळलो असतो तर......



मुंबै, दिनांक :- पा / ऊ / स .
सचिन ठाकूर.